। पनवेल । वार्ताहर ।
वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरुन तळोजा येथील घोट गावातील निवृत्ती पाटील (50) यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन फरार झालेल्या तिघा बाप लेकापैकी मनोज बाळाराम पाटील (24) याला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र बाळाराम पाटील व त्याचा दुसरा मुलगा नितीन पाटील हे दोघे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
तळोजा येथील घोटगावात रहाणारे मृत निवृत्ती पाटील व त्याचा मोठा भाऊ बाळाराम पाटील व त्यांची बहिण सुनंदा कोळेकर या तिघा भावंडांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वडिलोपर्जित जागेच्या हक्कावरून वाद सुरु होते. गत सोमवारी सायंकाळी सुनंदा कोळेकर, निवृत्ती पाटील व त्यांचा मुलगा निरंजन पाटील हे तिघेही घोटगाव पिंपळपाडा येथील चाळीसाठी बोअरवेलच्या पाईप लाईनचे काम करत असताना त्याठिकाणी कोयता घेऊन गेलेल्या बाळाराम पाटील, मनोज पाटील आणि नितीन पाटील या तिघांनी त्यांना बोअरवेलच्या पाईपलाईनचे काम करण्यास विरोध केला. यावरून त्यांच्यात वादावादी होऊन भांडण झाले.
या भांडणामध्ये मनोजने निवृत्तीच्या डोक्यावर व गळ्यावर कोयत्याने तीन चार वार करुन निवृत्ती पाटील यांची हत्या केली होती. या हत्येनंतर तिघा बाप लेकांनी त्याठिकाणावरुन पलायन केल्यानंतर तळोजा पोलिसांनी तिघा बापलेकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपी मनोज पाटील याची माहिती मिळवून त्याला अटक केली आहे.