। पनवेल । वार्ताहर ।
पैसे पडल्याचे सांगून दिशाभूल करणार्या दोघा चोरट्यांनी एका व्यक्तीजवळ असलेली तब्बल दोन लाख रुपयांची रोख रक्कम व इतर कागदपत्रे असलेली पिशवी लांबविल्याची घटना तळोजा येथे घडली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेतील तक्रारदार चंद्रकांत पाटील (40) हे तळोजा येथील वलप भागात राहण्यास असून त्याच ठिकाणी त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. पाटील यांना आपल्या दुकानाची दुरुस्ती करायची असल्याने ते तळोजा एमआयडीसीतील एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पाटील यांनी बँकेतून दोन लाख रुपये काढल्यानंतर सदर रक्कम घेऊन ते बँकेच्या बाहेर आले. यावेळी चंद्रकांत पाटील खाली पडलेल्या नोटा उचलण्यासाठी गेले असतानाच मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी पाटील यांनी मोटारसायकलला अडकवलेली रोख रक्कम व इतर कागदपत्रे असलेली पिशवी घेऊन पलायन केले. सदरची पिशवी चोरुन नेल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.