एक कोटी किंमतीची कलाकृती

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सह्याद्री कला महाविद्यालयात जागतिक दर्जाचे चित्रकार-शिल्पकार सदानंद बाकरे यांनी प्रात्यक्षिक दाखवताना घडवलेल्या एका कलाकृतीची किंमत एक कोटी रुपये असल्याची माहिती या कला महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी दिली आहे.
कलाकार एखादी कलाकृती घडवतो, त्या वेळी तो त्यामध्ये आपले प्राण ओतत असतो. कदाचित यामुळेच जागतिक दर्जाच्या कलावंतांच्या कलाकृतींना कोट्यवधींची किंमत आकारली जाते. बाकरे यांनी एक प्रयोगशील कलाकार म्हणून आपल्या चित्र व शिल्पकलेचा वेगळा ठसा कला जगतावर उमटवला.
सदानंद बाकरे इंग्लंडमधून परतल्यानंतर मुरुड समुद्रकिनारी बाकरे यांचे मन रमले आणि तेथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यामुळे यापुढील काळात त्यांची ओळख कोकणातील अग्रगण्य कलाकार अशी झाली.
सह्याद्री कला महाविद्यालयाला बाकरे यांनी अनेकदा सदिच्छा भेट दिली. एका भेटीच्या दरम्यान प्रात्यक्षिक दाखवण्याची विनंती राजेशिर्के यांनी केली. महाविद्यालयाच्या परिसरात एका नवीन इमारतीचे काम सुरू होते. लाकडाच्या पट्ट्या इतस्ततः विखुरलेल्या पाहून शिल्पकार बाकरे यांनी भौतिकशास्त्र वापरून त्यांनी बाटलीच्या तोंडावर तोल साधेल, अशी अर्धवर्तुळाकार कलाकृती घडवली.
या कलाकृतीच्या दोन्ही बाजूला करवंट्या लावून त्यात पक्ष्यांना खाणं आणि पाणी ठेवण्याची सोय केली. पक्ष्यांच्या येण्या-जाण्याने कलाकृती हलली तरीही तिचा तोल भौतिकशास्त्राच्या आधारे या कलाकृतीत सावरला जात असल्याचे बाकरे यांनी दाखवून दिले होते. नवोदित कलाकार ही कलाकृती पाहून अचंबित तर झालेच, शिवाय यातून खूप काही शिकले असल्याची माहितीही राजेशिर्के यांनी दिली आहे.

Exit mobile version