। रसायनी । प्रतिनिधी ।
लोधिवली येथील पाझर तलावात मौजमजा करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. सुनिल मोरे (रा. गोवंडी, चेंबूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 18) घडली.
लोधिवली येथील पाझर तलावावर सुनिल मोरे हे आपल्या 10 ते 12 मित्रांसह फिरायला आले होते. यावेळी सुनील हे तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच चौक पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरिक्षक विशाल पवार व सहकारी पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. तसेच, हेल्प फाऊडेंशन टिमला पाचारण करताच काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ शोध सुरु करून मृतदेह तलावाबाहेर काढला. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत खालापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शंनाखाली चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार अधिक तपास करीत आहेत.