अल्पवयीन मुलाच्या दुचाकीने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू

। मुंबई । प्रतिनिधी ।

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. एकीकडे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण चर्चेत असताना मुंबईतही अशाच प्रकारचा एक भीषण अपघात झाला आहे. मुंबईत एका अल्पवयीन मुलाच्या दुचाकीने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील माझगाव परिसरात गुरुवारी (दि. 23) सकाळी सातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एक 15 वर्षांचा मुलगा माझगाव डॉक सर्कल येथून नेसबीट ब्रीज मार्गे जे जे रोडच्या दिशेने येत असताना त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाईकची धडक झाली. या घटनेत इरफान नवाब अली शेख (32) नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्या तरुणाला तात्काळ भायखळा येथील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मुंबईतील जे. जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version