| रत्नागिरी | प्रतिनिधी |
गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे भागात मासे पकडण्यासाठी गेलेला एक व्यक्ती समुद्रात बुडाला आहे. नौशिन नजीर पेवेकर (38) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (दि.27) सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने मासेमारी नव्या जोमाने सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी मजगाव येथील तीन-चार जण मासे पकडण्यासाठी म्हणून भंडारपुळे येथे गेले होते. तेथे मासा पकडण्याच्या नादात नौशिन पेवेकर तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या सहकार्य़ांनी त्यांना पकडण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि त्यात नौशिन बुडाले. या घटनेची माहिती तातडीने आसपासच्या लोकांना तसेच नातेवाईकांना देण्यात आली. त्यामुळे असंख्य लोक तेथे गोळा झाले. त्यांनी तातडीने समुद्रात शोधाशोध सुरू केली. घटना घडल्यानंतर सुमारे दोन तासांनी नौशिन यांचा शोध लागला. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेबद्दल पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तेही लगेचच घटनास्थळी हजर झाले.