खारपाटील यांच्या माध्यमातून शुभारंभ
| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय ते मुळपाडा जनरल हॉस्पिटल पर्यंतच्या अंतर्गत मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून बुधवारी (दि.28) या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
उरण तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावातील अंतर्गत मुख्य व जोड रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज, तलाठी कार्यालय, बँका, ग्रामपंचायत कार्यालय, महागणपती मंदिर, जंगल सत्याग्रहाचा इतिहास जपणारे हुतात्मा स्मारक, अक्कादेवी पर्यटन स्थळ व अन्य सेवा सुविधा असल्याने शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर चिरनेर गावात ये-जा करत असतात. मात्र, येथील रस्त्यांची दुरावस्था पाहून बाहेरील नागरिक नाके मुरडतात. यंदाच्या पावसाळ्यात तर या अंतर्गत रस्त्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून, चिरनेर ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी आणि पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीच्या सहकार्यातून या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मुळपाडा येथील महागणपती देवस्थानकडे जाणारा मुख्य अंतर्गत रस्ता काही ठिकाणी अरुंद असल्यामुळे चारचाकी वाहने चालविणे मोठे जिकरीचे झाले होते. मात्र, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी यांच्या नेतृत्वाखाली उद्योगपती पी.पी. खारपाटील, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, संजय पाटील, अलंकार परदेशी तसेच कार्यकर्त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. यासाठी स्थानिक मुळपाडा ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य लाभले आहे. या रस्त्याच्या कामाला आता युद्ध पातळीवर सुरुवात झाली असून, पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीने हा रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले असून गणेश उत्सवाच्या आगमना आधीच या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्याचा मनोदय उद्योगपती पी.पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, भास्कर मोकल, सचिन घबाडी यांनी व्यक्त केला आहे.
रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्योगपती राजेंद्र खारपाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, अलंकार परदेशी, बाळाराम म्हात्रे, भास्कर ठाकूर, रवी ठाकूर, के.बी. ठाकूर, प्रमोद पोवळे, हर्षल पोवळे, महेश पवार, पद्माकर फोफेरकर, संतोष ठाकूर, सुरेश पाटील, प्रफुल्ल खारपाटील, समाधान ठाकूर, गजानन ठाकूर, मृणाली ठाकूर, अरुण पाटील, बबन गोंधळी, संताजी ठाकूर तसेच अन्य मानकर उपस्थित होते.