दोन अर्ज छाननीत बाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी पार पडली. एकूण 152 अर्जांपैकी दोन अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून, 150 अर्ज पात्र ठरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणूक होत असून, गुरुवारी सकाळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अर्ज छाननी प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या 59, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, चौल आणि कावीर असे सात जिल्हा परिषद गट असून, वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, कावीर आणि रामराज असे 14 पंचायत समिती गण आहेत.
या सात जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण 2 लाख 1 हजार 923 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बुधवार (दि.21) पर्यंत जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी 56, तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी 96 असे एकूण 152 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या छाननीत पंचायत समितीच्या दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे हे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.





