। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आदिवासीवाडीमधील एका 26 वर्षीय इसमाची गळा आवळून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ही घटना बुरूमखाण येथील आदिवासीवाडीवर घडली. याप्रकरणी हत्या करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेल्याने आरोपीने रागाच्या भरात त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राहुल उदय वाघमारे (20) असे या आरोपीचे नाव आहे. बुरूमखाणमधील आदिवासीवाडी येथील तो रहिवासी आहे. सोमवारी (दि.22) रात्री संतोष वाघमारे यांच्यासोबत आरोपीचे किरकोळ कारणावरून भांडण सुरु होते. वाद विकोपाला पोहोचल्याने संतोष यांचा मुलगा अजय वाघमारे भांडण सोडविण्यासाठी पुढे आला. रागाच्या भरात राहुलने अजयला धक्काबुक्की करून खाली पाडून त्याच्या अंगावर बसला. त्यानंतर त्याने अजयचा गळा दाबला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अजय याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या राहुलच्या विरोधात अजयची पत्नी अर्चना वाघमारे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून मारेकर्याला पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली. अखेर त्याला बुधवारी (दि.24) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला गुरुवारी (दि.25) अलिबाग येथील न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.







