माणगाव-पुणे मार्गावरील निजामपूर येथे अपघात
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर बसस्थानकासमोर शिव हॉटेलजवळ कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 17 वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे तात्काळ आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी हजर झाले. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 04) सकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास क्रिशांत विजय उबाळे (वय 19 वर्ष, रा. पिंपळोली बौद्धवस्ती तालुका मुळशी, जि. पुणे) हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी बलेनो गाडी (क्र. एमएच 12 एक्सटी 4437) घेऊन पुण्याकडून माणगावकडे जात होता. दरम्यान निजामपूर बसस्थानक येथील शिव हॉटेलजवळ आले असता सलीम मोहम्मद चाफेकर (वय 40 वर्षे रा. निजामपूर ता. माणगाव) तसेच, प्रगती बबन सुतार (वय 17 वर्षे रा. बामणगाव निजामपूर ता. माणगाव) हिला धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले. सलीम चाफेकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून क्रिशांत उबाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.स.इ.जाधव करीत आहेत.







