| गोवा | वृत्तसंस्था |
गोवामधील परणेम येथील पत्रादेवी गोवा पोलीस चेकपोस्ट समोर बुधवारी (दि.17) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कार कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण वाघोली परिसरातील असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती इको कारमध्ये 10 जण होते. कार प्रथम दोन दुचाकींना धडकून नंतर कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात कार चालक कांतीलाल विठ्ठल शिंदे (वय 47) यांचा मृत्यु झाला आहे. इतर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच बालकांचा समावेश आहे. तर वाघोली येथील श्रीराम तुकाराम बनकर (वय 32) हा चालक जखमी झाला आहे. जखमींवर गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, गोवा पोलीसांनी चालक बनकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.