| पनवेल | वार्ताहर |
सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कुटीला पाठीमागून भरधाव येणार्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात स्कुटीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सायन-पनवेल मार्गावरील कळंबोली सर्कल येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अपघातातील मृत व्यक्तीचे नाव नरेंद्र प्रभाकर त्रिवेदी (56) असे असून, ते नवीन पनवेल सेक्टर 16 मध्ये कुटुंबासह राहत होते. त्रिवेदी हे गुरुवारी (दि.19) सकाळी पुणे येथे नातेवाइकाच्या श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिवनेरी बसने कळंबोली येथील मॅकडोनाल्डसमोरील रस्त्यावर उतरले होते. त्रिवेदी यांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा हर्षित त्रिवेदी कळंबोली येथील बसस्टॉपवर स्कुटी घेऊन गेला होता. हर्षित वडिलांना घेऊन नवीन पनवेल येथील घरी जात असताना, कळंबोली सर्कल येथील सिग्नल लागल्याने उभा होता. याच वेळी पाठीमागून येणार्या टेम्पोने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. त्यामुळे स्कुटीवरील हर्षित आणि त्याचे वडील नरेंद्र त्रिवेदी हे दोघेही खाली पडले. या अपघातात नरेंद्र त्रिवेदी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कळंबोली पोलिसांनी टेम्पोचालक सुखराम कांता कुरमी (66) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.