टेम्पोच्या धडकेत एक ठार; तिघे जखमी

। पोलादपूर । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे झालेल्या एका विचित्र अपघातात चहा पिण्यासाठी थांबलेल्या गोवा येथे जाणार्‍या प्रवाशांना संगमेश्‍वर येथून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. 18 मार्च रोजी पहाटे ऑरा कारमधून (क्र. एमएच 48 बीटी 1817) जयेश राऊत (38) आणि अंजली राऊत (32) व चालक विनीत राऊळ (37) तिघेही विरार मुंबई येथील राहणारे असून, ते गोवा येथे जात असता कशेडी बंगला येथे गाडी थांबवून पीत उभे होते. त्याचवेळी मोटार सायकल बजाज पल्सर क्रमांक एमएच 08 टी 3666 वरील अशोक तुळशीराम पांगले (50) मुंबई (जखमी) आणि अशोक राऊत (रा.कसबा, ता. संगमेश्‍वर) हेदेखील चहा पिण्याकरिता थांबले होते. त्याचवेळी मुंबई ते संगमेश्‍वर असा जाणारा टाटा एसी गोल्ड टेम्पो (एमएच 08 एटी 9211) चा चालक-महम्मद यासीन उमर फारुख पठाण 5 संगमेश्‍वर मापारी मोहल्ला हा मोहम्मद हमाद उमर फारूक पठाण (25, रा. संगमेश्‍वर मापारी मोहल्ला) याच्यासह मुंबई ते संगमेश्‍वर असा चालवत घेऊन जात असता झोप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून महामार्गालगत टपरीवर चहा पीत असलेल्या लोकांना ठोकर मारून अपघात केला.
अपघातात गंभीर जखमी विनीत राऊळ याला जास्त गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरिता नरेंद्र महाराज ट्रस्टच्या अ‍ॅम्ब्युलन्सने पोलादपूरला ग्रामीण सरकारी रुग्णालय येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झाला. जखमींवर उपचार सुरू असून, काहींना किरकोळ जखमा असल्याने उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. अपघातस्थळी असलेली अपघातातील वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत चालू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपनिरिक्षक ए.पी. चांदणे यांनी दिली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version