ट्रकच्या धडकेत एक ठार


माणगाव | वार्ताहर |
माणगावपासून दहा कि.मी. अंतरावर असणार्‍या लोणेरे गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर दीपक सर्व्हिस सेंटरच्या समोर भरधाव जाणार्‍या ट्रकने विरुद्ध दिशेला जाऊन समोरुन स्कुटीला धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटी चालकाला गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात 9 जून रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद महेश सुभाष केसरकर (25) रा. पहेल, ता. माणगाव यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. या अपघाताबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अपघातातील आरोपी ट्रकचालक मिखिलेश चंद्रिका चौहान (29) रा. सगरी, जि. अझमगड, राज्य उत्तर प्रदेश याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्र. जी.जे. 15 ए.टी. 2099 हा लोणेरे बाजूकडून महाड बाजूकडे चालवीत घेऊन जात असताना, महाड बाजूकडून लोणेरे बाजूकडे जाणारी स्कुटी क्र.एम.एच.06 सी.सी 9605 या गाडीला धडक दिली. या अपघातात स्कुटीचालक शुभम धोंडीराम वाघमारे (22) रा. पहेल, ता. माणगाव यास गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याला अधिक औषोधोपचारासाठी पनवेल येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आरोपी ट्रकचालक गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. नावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर.डी. ढोबळे हे करीत आहेत.

Exit mobile version