एक लाख 389 स्काऊट गणवेशाविना

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी अधिक निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विभागाने नियमित गणवेशाबरोबरच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्काऊड गाईड गणवेश देण्याचा निर्णय घेतला. हे गणवेश घालून विद्यार्थी स्वातंत्र्यदिन साजरा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गणवेशासाठी कापडच उपलब्ध झाले नसल्याने एक लाख 389 स्काऊट गणवेशाविना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये 98 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना लागू करण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थी रमावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शाळांमध्ये दप्तराविना शाळा सारखे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासबरोबरच बौद्धिक व शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात शाळा सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नियमित गणवेशासह स्काऊट गणवेश मिळणार, अशी घोषणा सरकारने केली. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग कामाला लागले. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये नियमित शाळेचा गणवेश विद्यार्थ्यांना मिळाला. मात्र, शाळा सुरु होऊन दोन महिने होत आली आहेत. तरीदेखील स्काऊटचा गणवेश अजूनपर्यंत मिळाला नसल्याचे समोर आले आहे. सरकारकडून कापडच उपलब्ध झाले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती मिळावी, त्यांना शालेय स्तरापासूनच शिस्त राहावी, एक जागरुक नागरिक निर्माण व्हावा यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्काऊट गणवेश देण्याचा निर्णय घेतला. गणवेशासाठी लागणारे कापड सरकारकडून मिळणार होते.

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक लाख 389 विद्यार्थ्यांना स्काऊटचे गणवेश मिळण्याची अपेक्षा होती. त्यामध्ये 50 हजार 514 मुली व 49 हजार 875 मुलांचा समावेश आहे. या गणवेशाच्या शिलाईसाठी शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागे 110 रुपये खर्च करण्याची तयारीदेखील दाखविण्यात आली. त्यासाठी सुमारे एक कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यावर्षी 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. ध्वजरोहणासह विविध कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शाळांमध्ये तयारी करण्यात आली. परंतु, सरकारकडून स्काऊटचे कापडच अद्याप शाळांपर्यंत पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे. सरकारच्या अनास्थेमुळे 77 वा स्वातंत्र्यदिन स्काऊट गणवेशाविनाच साजरा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. नियोजनाचा अभाव असल्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्रदिन शाळेतील गणवेशावरच साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्काऊटचे कापड काही दिवसांपूर्वी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध झालेले कापड तालुक्याला वितरीत करण्याचे काम सुरु आहे. काही शाळांपर्यंत ते कापड पोहोचले असून, काही शाळांमध्ये शिलाई करण्याची प्रक्रियादेखील सुरु आहे.

पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी,
प्राथमिक विभाग, रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version