पालीत लांडोरचा मुक्तसंचार

| सुधागड -पाली | वार्ताहर |

पाली शहरांमध्ये एक लांडोर दोन दिवसांपासून मुक्तसंचार करताना आढळून आली आहे. त्यामुळे पालीकरांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सर्वत्र फिरणार्‍या या लांडोरला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

शनिवारी पालीतील ग्रामस्थ प्रशांत हिंगणे यांनी येथील रोहिदासनगर येथे लांडोर आल्याची महिती दिली. त्यानंतर वन्यजीव रक्षक दत्तात्रय सावंत यांनी वनविभागाला ही माहिती दिली. तात्काळ वनविभागाचे कर्मचारी विनोद जाधव या ठिकाणी पोहोचले. त्यांनी इमारतीच्या गच्चीवर आलेल्या लांडोरचे निरीक्षण केले व तिला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगितले. येथील महिलांनी लांडोर समोर पाणी ठेवले हे पाणी मोराने प्यायले. त्यानंतर मोर तिथून उडून दुसर्‍या घराच्या छपरावर गेला. तसेच मोराला पकडण्याचे व दुखापत न करण्याचे वनविभागाने नागरिकांना आवाहन केले. रविवारीही येथील बँक ऑफ इंडिया समोरील घराच्या छपरावर बसली होती यावेळी येणार्‍या जाणार्‍या लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी या लांडोरीला मोबाईलमध्ये कैद केले. यावेळी वन्यजीवन रक्षक दत्तात्रय सावंत, केतन म्हसके, तुषार केळकर, शंतनू लिमये व ओमकार खोडागळे आदींनी जाळे टाकून लांडोरला पकडले, मात्र जाळ्यातून बाहेर काढताना लांडोर निसटले त्यानंतर लांडोर तिथून उडून गेली. ही लांडोर नक्की कुठून आली याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. पाली शहराच्या आजूबाजूच्या जंगलात मोर आढळत नाहीत. मात्र येथील काही दाट व दुरवरील जंगलात मोर आढळतात. पण तेथून ही लांडोर शहरात येणे अवघड आहे. कदाचित कोणत्या फार्महाऊस मध्ये लांडोर ठेवली असू शकते व ती तेथून उडून पालीत मानवी वस्तीत येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही असले तरी या लांडोरला सुखरूप पकडून जंगलात मुक्त करणे गरजेचे आहे. अन्यथा वाहनांची धडक लागून किंवा मोकाट कुत्रे व कावळे यांच्यामुळे या लांडोरला धोका संभवतो.

Exit mobile version