नागरिकांचा अपेक्षा भंग, वर्षभरात राजकीय उलथापालथ
| सुधागड -पाली । वार्ताहर ।
न्यायालयीन बाबी, राजकीय अनास्था व विरोध अशा अनेक अडचणींवर मत करत पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यानंतर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिली नगरपंचायत प्रस्थापित झाली. पालिकारांना विकासाची स्वप्न पडू लागली, शहरातील सोयीसुविधा आता आपल्याला मिळणार म्हणून सगळेच जण आनंदी होते. मात्र नगरपंचायतीला एक उलटून गेले, मात्र शहराचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. उलट वर्षाच्या आतमध्ये पहिल्या नगराध्यक्षांनी अचानक राजीनामा दिला. परिणामी राजकिय उलथापालथ झाली. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी घडामोडी झाली. शिवाय काही दिवसांपूर्वी सभापती पदासाठी देखील राजकीय कुरघोड्यांना उत आला होता. आशा अनागोंदी मुळे पाली नगरपंचायत अस्थिर झाली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक व लोकप्रतिनिधी कटकारस्थानात मश्गुल असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे कोणाचेच लक्ष नाही.
ग्रामपंचायत असताना असणार्या कचरा, डम्पिंग ग्राउंड, सांडपाणी व्यवस्था, चांगले रस्ते, बस स्थानक, घनकचरा व्यवस्थापन, 27 कोटींची प्रलंबित शुद्धपाणी योजना अशा बहुतांश समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे या समस्यांनी ग्रासलेल्या शहराचा विकास होणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. नगरपंचायत निवडणुकीत तत्कालीन मंत्री, नेते व पदाधिकार्यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती. 27 कोटींची फिल्टर पाणी योजना आणतो, ब दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करतो अशी आश्वासने दिली होती. मात्र वर्षानंतर पालीकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
पाली नगरपंचायत हद्दीतील या समस्या सुटण्यासाठी पाली नगरपंचायत सर्व निवड लोकप्रतिनिधी राजकारण बाजूला ठेवून पालीच्या विकासासाठी एकत्र येणे नितांत आवश्यकता आहे.
-प्रकाश पालकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली
पालीकरांनी ज्या विश्वासाने आम्हा सर्वांना निवडून दिले आहे. त्यांच्या या विश्वासाला तडा न जाता पालीकरांनी जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे. ते नक्कीच साकार करणार.
अरिफ मनियार, उपनगराध्यक्ष पाली नगरपंचायत