24 दिवस साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील समुद्रासह खाडीकिनारी राहणाऱ्या 145 गावांना उधाणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 14 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा समुद्रकिनाऱ्यावर उसळणार आहेत. समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या गावांमध्ये पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. याचा फटका या गावांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार नागरिकांचा जीव संकटात असल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. जीवितहानीबरोबरच वित्तहानीदेखील प्रचंड झाली आहे. रायगड जिल्ह्याला 240 किलो मीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, रोहा, पनवेल, पेण आदी तालुक्यातील असंख्य गावे, समुद्रकिनारी व खाडी किनारी आहेत. अतिवृष्टीसह उधाणाचे संकट जिल्ह्याला कायमच असते. अलिबाग तालुक्यातील अनेक गावांना उधाणाचा फटका बसत आला आहे. उधाणाचे पाणी गावांमध्ये शिरण्याची भिती असते. पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येत असते. उधाणामुळे समुद्र किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांमुळे किनारी भागात समुद्राचे पाणी शिरते. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडील वेळापत्रकानुसार यावर्षीच्या पावसाळ्यात समुद्राला 24 दिवस मोठे उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत.समुद्र तसेच खाडी किनारपट्टी भागात पाणी शिरण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. उधाणावेळी मुसळधार पाऊस पडल्यास या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी 46 तर खाडीकिनारी 99 अशा 145 गावांचा समावेश आहे. 14 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामध्ये सर्वात मोठ्या 4.89 मीटर उंचीच्या लाटा 16 जुलै रोजी उसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या उधाणाचा सर्वात मोठा फटका रायगड जिल्ह्यातील समुद्र तसेच खाडी किनाऱ्यावरील गावांना बसणार आहे. उधाणाच्यावेळी मुसळधार पाऊस पडल्यास या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्यस्त
रायगड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत किनारपट्टीवर उंच लाटा उसळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 145 गावांतील सुमारे दहा हजार नागरिकांना या संकटाशी सामना करावा लागणार आहे. या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास किनाऱ्या लगत असलेल्या गावांमध्ये पाणी शिरणार आहे. याबाबत उपाययोजनाची माहिती घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र ते व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. परंतू त्यांनी गांभीर्याने याबाबत पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
साडेचार मीटरपेक्षा उंच लाटांवर दृष्टीक्षेप
14 ते 19 जून
13 ते 18 जुलै
12 ते 16 ऑगस्ट
10 ते 13 आणि 28 ते 30 सप्टेंबर







