पनवेलमधील सेंट जोसेफ हायस्कूलवर गंभीर आरोप
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील सेंट जोसेफ हायस्कूल येथे फी न भरल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला तब्बल दोन वर्षे दहावीच्या वर्गात बसू न देणे आणि एसएससी परीक्षेला मज्जाव केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ हायस्कूल या शाळेविरोधात गंभीर तक्रार समोर आली आहे. अनुष्का मोरे या विद्यार्थिनीला फी थकबाकीच्या कारणावरून दहावीच्या वर्गात बसू दिले नाही, तसेच एसएससी परीक्षेसाठीही अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार सलग दोन वर्षे सुरू असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे विद्यार्थिनीला तिसरी ते नववीपर्यंतच्या वर्गांची प्रगती पुस्तकेही देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तिच्या शैक्षणिक प्रगतीची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.
यासंदर्भात परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल केली. पनवेल तालुका गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी चौकशीचे आदेश देत केंद्रप्रमुख निंबाजी गीते यांची नियुक्ती केली आहे. संबंधित शाळेला भेट देऊन सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, दोन वर्षे शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे विद्यार्थिनीचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत असून, तिला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी पुढे आली आहे. तसेच तिसरी ते नववीपर्यंतची सर्व प्रगती पुस्तके तात्काळ देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात त्वरित न्याय न मिळाल्यास शाळेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





