मुंबईत 28 एप्रिलला तीव्र निषेध आंदोलन
| मुंबई | प्रतिनिधी |
प्रकाशक प्रशांत आंबी यांना कथित शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, डावे व पुरोगामी संघटनांकडून 28 एप्रिल रोजी मुंबईत तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मंगळवार, 28 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष आणि पुरोगामी समविचारी संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरस्थित प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी सुमारे चार दशकांपूर्वी लिहिले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची वेगळी मांडणी करणारे महत्त्वाचे साहित्य म्हणून ते ओळखले जाते. देशातील विविध भाषांमध्ये त्याचे भाषांतर होऊन लाखो प्रतींची विक्री झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनीही या पुस्तकाला अभ्यासपूर्ण मान्यता दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आयोजकांच्या मते, पुस्तक न वाचता केवळ शीर्षकावरून प्रतिक्रिया देणे आणि थेट धमक्या देणे ही लोकशाहीविरोधी व धोकादायक प्रवृत्ती आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाचे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी केले असून, “लोकशाही मूल्यांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हा लढा आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून, प्रशासन आणि सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







