उमेदवार मंजुषा राणेंच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव, वैजाली व खंडाळे ग्रामपंचायतीच्या तीन सदस्य पदांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रचाराला सुुरूवात करण्यात आली आहे. नागाव ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार मंजुषा राणे यांच्या प्रचाराला वेग असून घरभेटीतून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागावचे सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह निखील मयेकर असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य या प्रचारात सहभागी झाले. त्यामुळे पहिल्या दिवसांपासूनच प्रचाराला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. दरम्यान शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनीदेखील नागावमध्ये भेट देऊन मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील वैजाली ग्रामपंचायतीच्या एक सदस्यपदासाठी दोन, नागावच्या एक सदस्यपदासाठी दोन आणि खंडाळेच्या एक सदस्यपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वैजाली, खंडाळे व नागाव या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यपदाच्या जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे.28 एप्रिलमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.मतमोजणी दुसऱ्या दिवशी 29 एप्रिलला होणार आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या उमेदवार मंजुषा राणे, वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार नंदकुमार प्रभाकर पाटील, खंडाळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार समिक्षा सागर गुरव हे शेकापचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उमेदवार मंजुषा राणे यांचा प्रचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. घरोघरी जाऊन मतदारसंघातील मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मंजुषा राणे यांना प्रचारातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.




