वरंध घाटात दरीत कोसळून एक ठार

| महाड | प्रतिनिधी |
वरंध घाटात दरीत कोसळून मंडणगड येथील जिल्हा परिषद मराठी शाळा अडखळ येथील शिक्षक अब्दुल खुदोबुद्दीन शेख (41) यांचा मृत्यू झाला. सेल्फी काढण्याच्या वा घाटात माकडांना खाऊ घालण्याच्या नादात त्यांचा पाय घसरुन दरीत पडल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. शेख हे मुळचे एरंडी जि.लातूर असून सध्या ते मंडणगड येथे शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेख हे आपल्या लाल रंगाच्या फोर्ड फिगो गाडीतून मंडणगडकडे येत होते.त्यावेळी ही दुर्घटना घडली.याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी शोध कार्याला सुरुवात केली. रात्रीची वेळ असल्याने शोध कार्यामध्ये अडथळे निर्माण येत होते. महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीम, व्हेंचर सोल ग्रुप, आपादमित्र अभिताभ जाधव, सिस्कॅप संस्थेचे चिंतन वैष्णव, पारमाची गावचे सामाजिक कार्यकर्ते बबन मालुसरे व त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ खोल दरीमध्ये जाऊन त्या अनोळखी इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या पथकाला यश आले. शोध पथकाला खोल दरीमध्ये जाऊन त्या इसमाचा तपास करणे अवघड जात होते.

अनेक अडचणी येत असल्याने पारमाची गावाकडून एक पथक दरीमध्ये पाठवण्यात आल्यानंतर वरील रस्त्यापासून सुमारे पाचशे फूट खोल दरीमध्ये मृतदेह सापडला असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर भोर (जि. पुणे)पोलिसांच्या मदतीने मृतदेह भोर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी भोर तालुक्याचे तहसीलदार .मोहन पाटील, अजिनाथ गाजरे, पोलीस प्रशासन, तैनात असलेली बचावपथके आणि ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते.

Exit mobile version