श्रीवर्धन येथील समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

| श्रीवर्धन‌ | वार्ताहर |

तालुक्यातील आरावी येथील समुद्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.9) घडली आहे. आरावी येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या समुद्र किनाऱ्यावर सायंकाळी पाच वाजता एक व्यक्ती मृत अवस्थेत नागरिकांना वाळूत आढळून आला. आरावी येथील अमोल पुसाळकर यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीच्या पॅन्ट च्या खिशात आधार कार्ड मिळाल्याने सदरची मृत व्यक्ती सचिन काशिनाथ होडबे (43) बोरीवली येथील असल्याचे निष्पन्न झाले. श्रीवर्धन पोलीस ठाणे येथून मिळालेल्या अहवालानूसार होडबे हे पाण्यात पोहायला गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. श्वास गुदमरल्या मुळे हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version