तीन जण गंभीर जखमी
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी (दि.4) मध्यरात्री कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिकमधील कांची येथील प्रतीक संजय भंडारी (28) हा आपल्या मित्रांसह कारने गणपतीपुळे येथे जात होता. दरम्यान परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय 28, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय 33, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय 36, रा. पळसे, नाशिक) आणि चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूण येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.






