अथक शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथील धरणात पोहण्यासाठी गेलेले दहिगाव येथील दत्तू वाघमारे (44) हे रविवारी (दि.11) सकाळच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले होते. अखेर अथक शोधमोहिमेनंतर सोमवारी (दि.12) सकाळी त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तू वाघमारे ढोकशेत येथील धरणात उतरले असता ते अचानक खोल पाण्यात गेले. एका लहान मुलाने त्यांना पाण्यात बुडताना पाहिले आणि तात्काळ स्थानिकांना माहिती दिली. त्यानंतर, पाली पोलीस पथक, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे जिवरक्षक आणि पालीतील आपदा मित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर व्यापक शोधमोहीम सुरू केली. ढोकशेत येथील धरणातील पाण्याची खोली अंदाजे 120 ते 130 फूट असल्याने रेस्क्यू टीमच्या जिवरक्षकांसाठी शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे ठरत होते. प्रचंड खोली आणि नेमक्या जागेचा अंदाज न आल्याने रविवारी दिवसभरात यश आले नव्हते. मात्र, प्रशासकीय यंत्रणा आणि जिवरक्षकांनी हार न मानता सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम तीव्र केली असता अखेर वाघमारे यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. दरम्यान, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने गेल्या पाच महिन्यांपासून रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर फाटक यांच्याकडे ‘अंडरवॉटर ड्रोन’ हे उपकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून आश्वासने मिळाली असली तरी प्रत्यक्षात अजून ड्रोन मिळालेला नाही. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित ‘अंडरवॉटर ड्रोन’ उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी रेस्क्यू टीम व नागरिकांकडून केली जात आहे.
