| चिपळूण | प्रतिनिधी |
समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडून 3560 राख्या सीमेवरील अनेक भागात सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देशसेवेविषयीची भावना वाढीस लागावी म्हणून भारतीय जवानांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठविण्याचा उपक्रम समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आला.
भारतीय जवानांना रक्षाबंधनाला आपल्या मायभूमीत आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही. या विचाराने प्रेरित होऊन मुख्यप्रवर्तक समाजसेवक विनेश भाऊ मोहिते (सामाजिक विकास ग्रुप) यांच्या प्रेरणेने भारतीय जवानांना राखी पाठवण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहात चिपळूण तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला. हा एक अनोखा उपक्रम चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातून बचत गट कार्यालय तिवडी, ग्रामपंचायत आकले, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत खडपोली, न्यू इंग्लिश स्कूल खडपोली, युनायटेड स्कूल चिपळूण, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मिरजोळी या सहा ठिकाणी राबविण्यात आला.
देशाचे संरक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी, मराठी शाळा, बचत गट, ग्रामपंचायत, महाविद्यालय, गुहागरमधील शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी, महिला वर्ग या सर्वांनी शाळा, गाव, बचत गटातून एक एक राखी घेऊन भगिनी मोट्या प्रमाणात आल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी झालेल्याना समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडून 200 अभिनंदन पत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, महिला, तरुण, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, वरिष्ठ मंडळी उपस्थित होते. चिपळूण तालुक्यात या उपक्रमाचे स्वागत व कौतुक होत आहे.






