1 हजार 40 गावगुंड तडीपार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी कंबर कसली

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मागील नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिसांनी कडक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, आतापर्यंत तब्बल 1 हजार 40 गावगुंड व सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गावांमध्ये गुन्हेगारीच्या बळावर दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांना चांगल्या वर्तणुकीची तंबी देत त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीची हमीपत्रे लिहून घेण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होत असून, पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी, नागरिकांना निर्भीडपणे मतदान करता यावे, यासाठी रायगड पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे सज्ज झाले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. रायगड पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मतदारांवर विविध पद्धतीने दबाव टाकणारे तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार 40 जणांविरोधात अशी कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. गावांमध्ये गुंडगिरी करणाऱ्यांसह अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुंडांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमीपत्रे घेण्यात आली आहेत. आतापर्यंत नऊ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

एक हजार 430 शस्त्रे ताब्यात
मागील निवडणुकीदरम्यान खालापूर येथे भररस्त्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच महाडमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊन बंदूक उगारण्यात आली होती. या घटनांमुळे निवडणुकीला गालबोट लागले होते. यावेळी मात्र अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली असून, हाणामारी व राडे होऊ नयेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. राजकीय वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत एक हजार 430 शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मतदान व मतमोजणीच्या कालावधीत सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार असल्याने त्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात करण्यात आली आहे. अलिबाग येथे आरसीएफ वसाहतीतील सभागृहात दिवसभर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाज योग्य पद्धतीने पार पाडता यावे यासाठी कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
प्रशासकीय राजवट संपणार
जिल्ह्यातील 17 लाख 381 मतदार पाच फेब्रुवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत दोन हजार 323 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतमोजणी शनिवार, सात फेब्रुवारी रोजी होणार असून, मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरील प्रशासकीय राजवट संपून लवकरच राजकीय राजवटीची सुरुवात होणार आहे.
Exit mobile version