विमानतळ आणि रेल्वेप्रकल्पासाठी बाधित होणार्या वृक्षांच्या बदल्यात केली जाणार लागवड
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
निर्माणाधीन नवी मुंबई विमानतळ आणि पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामादरम्यान 167 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. पालिका हद्दीतील पर्यावरणाचे यामुळे नुकसान होणारा आहे. पर्यावणाची ही हानी रोखण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे जवळपास एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पालिका हद्दीतील 167 वृक्षांचा बळी जाणार आहे. पालिकेने तशा स्वरूपाची नोटीस संबंधित वृक्षावर चिकटवली असून, यासंदर्भात नागरिकांना काही हरकत अथवा सूचना करायची असल्यास योग्य कागदपत्रसहित सात दिवसांच्या आत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभाग आणि उद्यान विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल पालिका हद्दीलगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु आहे. विमानतळाच्या या कामादरम्यान कर्नाळा स्पोर्ट्स या ठिकाणी इंटरचेंज काम सुरु असून, येथे असलेले 142 वृक्ष कामात अडथळा ठरत असल्याने हे वृक्ष तोडण्याची परवानगी संबंधित विभागाकडून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभाग आणि उद्यान विभागाकडे केली होती तसेच पालिका हद्दीतील पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामात अडथळा ठरणारे 25 वृक्ष तोडण्याची परवानगी रेल्वे विभागाकडून पालिकेकडे करण्यात आली होती. पालिकेकडून ही परवानगी देण्यात आली असून, तशा स्वरूपाची नोटीस वृक्षांवर लावण्यात आल्यानंतर निसर्गप्रेमी नागरिकांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. पालिकेने नव्याने वृक्षलागवड करणार असल्याची माहिती दिल्याने निसर्गप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.