युध्दाचं एक वर्ष

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. युध्द आपण एक-दोन आठवड्यात जिंकू असं पुतीन यांना वाटत होतं. तो निव्वळ मूर्खपणाचा होता हे आता त्यांना कळून चुकले असेल. पण कोणत्याही हुकुमशहाप्रमाणे आपली चूक झाली हे ते मान्य करणार नाहीत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. युरोप आणि अमेरिकेने हे युध्द सुरू केले आहे, त्याचा शेवट आपण करू असा हिंदी सिनेमासारखा डायलॉग त्यात त्यांनी मारला. शिवाय, पाश्‍चात्य देश रशियन राष्ट्र, रशियन संस्कृती नष्ट करायचा प्रयत्न करीत आहेत असा दावाही त्यांनी केला. गोष्टी आपल्या विरोधात जायला लागल्या की राष्ट्रप्रेमाची भाषा केली जाते याचा अनुभव आपण भारतात सध्या घेत आहोतच. पुतीन, तुर्कीचे एर्दोगान इत्यादी याचेच नमुने आहेत हे पूर्वीही दिसले आहेच. रशिया जिंकला नसला तरी आतापर्यंत युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. डोनेट्स्क हा युक्रेनमधील महत्वाचा औद्योगिक व आर्थिक प्रांत आहे. त्याच्या एका भागावर रशियाने कबजा केला आहे. युक्रेनचे एक लाख सैनिक ठार झाले असून सात हजार नागरिकही मारले गेले आहेत. याखेरीज अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली आहे. युक्रेन हे गहू व सूर्यफुलाचे कोठार मानले जाते. पण ती शेती बरबाद झाली आहे. तरीही युक्रेनी सैन्य व जनतेने अत्यंत निर्धाराने रशियाचा प्रतिकार केला आहे. पाश्‍चात्य जगाने त्यांना चिलखती गाड्या, अचूक बाँबफेक करणारी विमाने, क्षेपणास्त्रे इत्यादी बाबी पुरवल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी अचानक युक्रेनची राजधानी कीव्हला भेट देऊन सर्वांना धक्का दिला. अमेरिका युक्रेनच्या मागे उभी आहे हे सांगण्यासाठी ते आले होते. युक्रेनलगत असलेल्या पोलंड व इतर पूर्वीच्या कम्युनिस्ट देशांच्या एका परिषदेतही बायडेन सहभागी झाले. दुसरीकडे याच वेळी चिनी परराष्ट्र खात्याचे उच्चाधिकारी पुतीन यांना मॉस्कोत भेटले. चीनने या संपूर्ण लढाईत रशियाची थेट वा आडून पाठराखण केली आहे. अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांशी चीनचा आर्थिक व इतर गोष्टींवरून संघर्ष चालू आहेच. त्यामुळे त्याने रशियाला मदतीचा हात दिला आहे. अमेरिका इत्यादींनी चीनवर लागू केलेल्या निर्बंधांमुळे रशिया मेटाकुटीस येईल व युध्द थांबवेल अशी पाश्‍चात्यांची अपेक्षा होती. पण चीनने ती फलद्रूप होऊ दिलेली नाही. भारतासारख्या जुन्या मित्रानेदेखील अमेरिकेला न जुमानता रशियाकडून क्रूड तेल खरेदी चालू ठेवली आहे. या सर्वांची गोळाबेरीज अशी आहे की, युक्रेन उद्ध्वस्त झाला असला आणि रशियाचीही प्रचंड हानी झाली असली तरी युध्द इतक्यात संपणारे नाही. अमेरिकी संरक्षण उत्पादक कंपन्यांनाही तेच हवे आहे. आपला माल इतक्या घाऊक रीतीने खपवण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यांचे नफे वाढतील. पण युरोप-अमेरिकेतील मंदी सहजी हटणार नाही. भारतासारख्या देशांना या मंदीचा जबर फटका बसणार आहे. 

Exit mobile version