। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस असल्याचे भासवून 12 लाख 40 हजार 280 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमानी प्रदीप जोशी (52) व्यवसाय नोकरी, रा. सन्मित्र मंडळ, रिस, प्लॉट नं.18/1 भटवाडी यांची तीन अनोळखी व्यक्तींनी 12 लाख 40 हजार 280 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी तक्रारदार हेमानी प्रदीप जोशी यांना पोलीस असल्याचे भासवून तुमच्या विरोधात नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली असून, खोटी एफआयआर प्रत तयार करून अज्ञात व्यक्तींनी हेमानी यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवून त्यामध्ये तुम्हाला अटक करू व तुमचे बँक खाते सील करू असे त्यांना सांगितले. याबद्दल त्यांनी हेमानी जोशी यांच्याकडून गुगल पे वर 90 हजार रूपये व आरटीजीएसद्वारे 11 लाख 50 हजार 280 असे एकूण 12 लाख 40 हजार 280 रूपये घेऊन फसवणूक केली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.







