| रसायनी | प्रतिनिधी |
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मंदिराच्या कामासाठी आणि घरबांधणीसाठी आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून खालापूर तालुक्यातील एका व्यक्तीची तब्बल 12 लाख 40 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोधीवली येथील रिलायन्स प्रकाश सीएचएस, अंबानी हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या फिर्यादी यांची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी क्रमांक 1 याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲप कॉल करून मंदिराच्या कामासाठी तसेच घरबांधणीसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, युरो चलनाद्वारे फिर्यादी यांच्या कॅनरा बँक खात्यात पैसे पाठविल्याचे सांगितले. मात्र, ही रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने आरोपी क्रमांक 1 याने आरोपी क्रमांक 2 हा भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी असल्याचे सांगून त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी क्रमांक 2 याने परदेशातून आलेली रक्कम भारतीय चलनात खात्यात जमा करण्यासाठी कर भरावा लागेल, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. या दोन्ही आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी दि.22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत वेळोवेळी आपल्या एचडीएफसी बँक व स्टेट बँक खात्यांतून आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर एकूण 12 लाख 40 हजार रुपये पाठविले. मात्र, आश्वासन दिलेली आर्थिक मदत मिळाली नाहीच, शिवाय पाठविलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







