विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण होणार सोपे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण ऑनलाइन झाले आहे. मात्र या शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडथळे येत आहेत. इंटरनेट, रेंज, स्मार्ट फोन्स नाहीत, अशा अनेक समस्यांमुळे बरेचसे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-विद्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एक क्लास, एक टीव्ही चॅनेल या मोहिमेचा विस्तार आता करण्यात आला आहे. पूर्वी या मोहिमेअंतर्गत पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक असे 12 टीव्ही चॅनेल्स सुरू करण्यात आले होते. मात्र आता त्यांची संख्या 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येऊ शकेल. ज्याचा जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी लाभ घेऊ शकतील.

Exit mobile version