महिलांना मिळणार ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

कृषी विभागाकडून महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतीच्या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना आता ‌‘शेतकरी‌’ म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी कृषी विभागाने महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून पात्र महिलांना अर्ज करून प्रमाणपत्र मिळवता येणार असून, शासकीय कृषी योजना, कर्ज, विमा आणि विविध कृषी सेवांचा लाभ थेट महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान अधिकृतपणे नोंदविण्यास या निर्णयामुळे मदत होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली.

शेती आणि शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 लागू केला आहे. महिला शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजना, कर्ज, विमा तसेच विविध कृषी सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी या कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत.

या कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलेच्या नावावर जमीन असणे ही शेतकरी म्हणून ओळख मिळविण्यासाठी अनिवार्य अट राहणार नाही. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या तसेच शेतीशी संबंधित कामात सहभागी असलेल्या महिलांनाही शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे केवळ जमीनमालकीच्या कागदपत्रांवर आधारित न राहता प्रत्यक्ष शेतीत योगदान देणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन महिला शेतकरी तसेच शेतमजुरांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या प्रत्यक्ष कामात योगदान देऊनही आजपर्यंत स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत ओळख न मिळालेल्या महिलांना या प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार आहे.

महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाने महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. पात्र महिलांना या माध्यमातून अर्ज करून प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

Exit mobile version