| माथेरान | वार्ताहर |
माथेरानची अस्मिता समजली जाणारी माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान धावणारी मिनीट्रेन तसेच अमनलॉज ते माथेरान धावणाऱ्या शटलच्या फेऱ्या या विकेंडला पर्यटकांनी भरभरून जात आहेत. माथेरान पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आणि मिनीट्रेनच्या फेऱ्या कमी यामुळे येणारे पर्यटकांना तिचा आनंद घेता येत नाही. यामुळे त्यांचा पुरता हिरमोड होत आहे. जर मिनीट्रेनचे आरक्षण असते, तर आमची माथेरान सहल समाधानाची झाली असती, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच मिनिट्रेन सेवेसाठी आरक्षण खिडकी सुरू करावी, अशी मागणी पर्यटक प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई, पुण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान पर्यटनस्थळाला दिवसेंदिवस पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. पर्यटकांचा राबता वाढत असताना नेरळ ते माथेरान मिनिट्रेनच्या फक्त दोनच फेऱ्या तसेच शनिवार व रविवार वगळता येथे अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या सहा फेऱ्या सुरू आहेत. पर्यटक संख्या जास्त आणि मिनिट्रेनच्या फेऱ्या कमी यामुळे येणाऱ्या पर्यटकांना तासन्तास रांगेत उभे राहूनसुद्धा तिकीट मिळत नाही. त्यामुळे नाराज पर्यटक येथे ऑनलाईन आरक्षण सुरू करावे, अशी मागणी करीत आहेत. या ऑनलाईन आरक्षणामुळे माथेरानचे पर्यटन वाढेल, असेही पर्यटकांचे म्हणणे आहे. याकरिता लवकरात लवकर येथे आरक्षण खिडकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
माझ्या परिवारातील बच्चेकंपनीला झुक झुक गाडीची म्हणजेच मिनिट्रेनची सफर करायची होती. नेरळ स्टेशनला उतरल्यावर आम्ही माथेरान मिनिट्रेनसाठी रांगेत उभे होतो. परंतु, तिकीट मिळाले नाही, त्यामुळे मुले निराश झाली. जर ऑनलाईन आरक्षण असते, तर आम्ही ते आरक्षित करून मिनिट्रेनचा आनंद मुलांना नक्कीच दिला असता. मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान मिनी ट्रेनबरोबरच अमनलॉज ते माथेरान शटल सेवेची आरक्षण सेवा सुरू करावी.
विनायक परब, पर्यटक, मुंबई