ऑनलाईन शाळांमुळे पालकांच्या चिंतेत भर

। खांब-रोहा । वार्ताहर ।
पुन्हा नव्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने इ. पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शाळा पूर्णतः बंद झाल्याने पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे. सुमारे दीड वर्षानंतर दीपावली सणानंतर सुरक्षिततेचे नियम पाळत हळूहळू सर्वत्र शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी अभ्यासात रमले होते. ऑनलाईन शिक्षण थांबून प्रत्यक्षात अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी झाल्याने शैक्षणिक कार्य करताना शिक्षकांनाही दिलासा मिळाला होता. तर, पालकवर्गही सुखावला होता. एकंदरीत परिस्थिती रूळावर आली असतानाच पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागल्याने अखेर शासनाने शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे पालकांनी जरी सहमती दर्शवली असली, तरी शाळाच बंद झाल्याने आपल्या मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.


तर शिक्षकांना आपल्या निर्धारित वेळेत आपलासा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे व अन्य शैक्षणिक बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक असल्याने याकामी त्यांना ऑनलाईन प्रक्रियेचा मार्ग अवलंबवा लागत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणिक प्रक्रियेत समाविष्ट केले जाते. अशावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेकरिता मोबाईलची व्यवस्था होत नसल्याने मोठीच समस्या निर्माण होते. याशिवाय नेटवर्क समस्याही निर्माण होते. त्याचबरोबर विद्यार्थी एकदा मोबाईलमध्ये गुंतले की, अभ्यासाच्या नावावर मोबाईलवर गेम खेळणे किंवा अन्य मनोरंजक गोष्टीसाठी विद्यार्थी मोबाईल वापरत असल्याने तिथूनही पालकांची डोकेदुखी निर्माण होते. एकंदरीत ऑनलाईन शाळांमुळे पालकांच्या चिंतेत अधिक भर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Exit mobile version