| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे ग्रामपंचायतीत 15 वर्षे सत्तेत असताना विविध विकासकामांना प्राधान्य देत नागोठण्याला आदर्श गाव करण्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. आज या जाहीर सभेच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरवरील सहा प्रभागांतील कामांची 50 टक्के यादीच आम्ही काय विकास केला हे दाखवत आहे. या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही या निवडणुकीत जनतेसमोर आमच्या उमेदवारांना घेऊन जात आहोत. विरोधकांप्रमाणे उमेदवार शोधण्याची वेळ आमच्यावर आली नाही. विरोधकांकडे विकासाचे कोणताही दृष्टीकोन नसल्याने इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल मला काळजी नाही. तुम्ही फक्त मत द्या, बाकी माझी जबाबदारी आहे. आघाडीच्या शबाना मुल्ला याआधीच बिनविरोध निवडून आल्याने निकालाच्या दिवशीही मताच्या पेटीत इंडिया आघाडीच दिसणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते किशोर जैन यांनी व्यक्त केला.
नागोठण्यातील गांधी चौक येथे गुरुवारी (दि.2) सायंकाळी शिवसेना (उबठा), काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप यांच्या जनसेवा विकास अर्थात इंडिया आघाडीच्या झालेल्या विजयपूर्व सभेत कार्यकर्त्यांना व मतदारांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी नागोठण्याचे माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, संजय भोसले, माजी सरपंच सुरेश कामथे, मोहन नागोठणेकर, काँग्रेसचे शब्बीर पानसरे, बिलाल कुरेशी, सगीर अधिकारी, अशपाक पानसरे, सद्दाम दफेदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जवरूद्दिन सय्यद, अकलाख पानसरे, शेकापचे घिसूशेठ जैन, डॉ. अन्वर हाफिज, संगिता जैन, निलोफर पानसरे, सुरेश जैन, विठ्ठलतात्या खंडागळे, नामदेव चितळकर, माजित लंबाते, कल्पना टेमकर, बिनविरोध आलेल्या सदस्या शबाना मुल्ला, धनंजय जगताप, धनवंती दाभाडे, प्रणिता पत्की आदींसह सरपंच पदाच्या उमेदवार सौ. सुप्रिया संजय महाडिक, सदस्य पदाचे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय सभेला उपस्थित होता. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन आपल्या खास शैलीत शिवसेनेचे संजय काकडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश कांबळे यांनी केले.