। अलिबाग । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीने अलिबागमध्ये सभेचे आयोजन केले होते. मात्र अमिष दाखवून अनेक मंडळींना बोलाल्याची चर्चा या सभेत रंगली आहे. दोनशे रुपयांपासून पाचशे रुपयांचे भत्ता देऊन अनेकांना या सभेत पाचारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सभेमध्ये येणारी मंडळी पैसे देऊन येत नाही, तर स्वतः मर्जीने येतात, असा दावा करणार्या तटकरेंची ही सभा निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.
रायगड जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. जस जसे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसा प्रचारदेखील वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे झालेल्या महायुतीच्या सभेलादेखील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर रेवदंडा बायपास रस्त्यालगत महायुतीची सभा आयोजित केली होती. ही सभा भरगच्च वाटत असली, तरीही अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. खुर्च्या रिकाम्या दिसल्याने उभ्या असलेल्या मंडळींना खुर्च्यांमध्ये बसविण्यासाठी खुद्द आदिती तटकरे यांची धडपड सुरु असल्याचे पहावयास मिळाले.
वेगवेगळ्या भागातील मंडळींना या सभेसाठी पाचारण करण्यात आले. दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये प्रती व्यक्ती भत्ता देऊन आणल्याची चर्चा या सभेत रंगली होती.त्यात काहींना भाजी पूरी आणि काहींना बिर्याणी देण्याचे अमिष दाखविले होते. काहींना दोनशे रुपये तर काहींना पाचशे रुपये ठरल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. गाडीतून घेऊन येणार्यांना चार हजार रुपये ठरल्याची चर्चा या सभेच्या निमित्ताने ऐकावयास मिळाली. महायुतीच्या सभेत अमिषाने भरलेल्या रिकाम्या खुर्च्यांची चर्चेने चांगलाच रंग धरल्याचे दिसून आले.





