उपोषणकर्ते त्यांच्या भूमिकेशी ठाम
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा सुरक्षा मंडळाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका घेत जिल्हाधिकारी व मंडळाचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंगळवारी दिले. मात्र त्याला उपोषणकर्त्यांनी विरोध केला. वरिष्ठांसमवेत चर्चा होईल तेव्हाच उपोषण मागे घेतले जाईल अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज गोतारणे, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव स्नेहल माटे, निरीक्षक मारूती पवार उपस्थित होते.
जिल्हा सुरक्षा मंडळामार्फत सुरक्षा रक्षक म्हणून सुमारे साडेतीन हजार तरुणांची भरती करण्यासाठी 2019 पासून प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र मोजक्याच तरुणांची नियुक्ती झाली. अन्य तरुण गेल्या पाच वर्षापासून नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. निवड झालेल्या अडीच हजारहून अधिक उमेदवारांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही. त्यामुळे या तरुणांनी श्रमिक व असंघटित कामगार हक्क संघटनेच्या वतीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केल आहे. सुरक्षा रक्षकांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई व्याजासहित द्यावी, खासगी निरीक्षकाची नेमणूक करावी, तातडीने नोकरी द्यावी आदी मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे.
या उपोषणानंतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ खडबडून जागे झाले. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने उपोषण थांबविण्याचा प्रयत्न केला. महसूल विभागाचे नायब तहसीलदार मनोज गोतारणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तात्पुरत्या स्वरुपात उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु उपोषणकर्ते त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिले आहेत. गेल्या पाच वर्षापासून न्याय्य हक्कासाठी लढा देत आहोत, त्याबाबत फक्त आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे उपोषण कायमच सुरुच राहणार आहे. जिल्हाधिकारी व सुरक्षा रक्षक मंडळाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्यानंतरच उपोषण मागे घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.
दोघांची प्रकृती खालावली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाविरोधात सोमवारपासून तरुणांनी उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी दुपारनंतर सिकंदर कोळी व रविंद्र बळी या दोघांची प्रकृती बिघडली. येथील उपोषणकर्त्यांनी जागेवर उपचार करावा, अशी मागणी केली. परंतु उपचारासाठी कोणीही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दाखल झाले नाहीत.
उपोषणकर्त्यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार, अशी त्यांची भूमिका आहे. लवकरच याबाबत बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयाला कळविले आहे, पोलिसांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मनोज गोतारणे, नायब तहसीलदार,
जिल्हाधिकारी कार्यालय