अनेक वनौषधी नामशेष
| उरण | प्रतिनिधी |
एकीकडे राज्य शासन संपूर्ण राज्यात शंभर कोटी झाडे लावण्याचा बेधडक कार्यक्रम राबवित आहे, तर वने व अभयारण्यातील वारेमाप वृक्षतोड थांबविण्यास शासन अपयशी ठरत असल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून त्याकडे वन विभाग कानाडोळा करत आहे.
ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने एकीकडे जगभरात ओरड सुरू असताना उरण परिसरात मात्र विकासाच्या नावाखाली वृक्षांची खुलेआम कत्तल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. खासगी असो वा सार्वजनिक मालमत्तेतील वृक्ष टप्प्याटप्प्याने तोडण्यात येत आहेत. यामुळे येथील वृक्षसंपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे माती उकरल्याने आवरे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, चिरनेर, दिघाटी, केळवणे परिसरात दिसणारा हिरवागार डोंगर हळूहळू उघडाबोडका होऊ लागला आहे. सार्वजनिक मालमत्तेबरोबरच वनविभागाच्या हद्दीतील लहान झाडांसह मोठी झाडेही तोडण्यात येत आहेत. मात्र अनेकदा याबाबत वन विभागामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने वृक्षतोड करणाऱ्या माफियांना एक प्रकारे अभय मिळत आहे.
वृक्षतोड झालेली लक्षात येऊ नये, यासाठी जे वृक्ष तोडले आहे, त्यांची खोडे मातीने अथवा पालापाचोळ्याने झाकण्यात येत आहेत. उरण परिसरात अशाच पद्धतीने डोंगरातील वृक्ष तोडण्यात येत आहेत. या बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील वनसंपदा नष्ट होत आहे. या वृक्षतोडीमुळे अनेक वनौषधीदेखील नामशेष झाले आहेत. वृक्षतोडीमुळे डोंगरातील माकडे, वानर, भररस्त्यात येऊ लागले आहेत. रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने ही वृक्षतोड केली जात आहे.
खारफुटीचीही कत्तल विकासाच्या नावाखाली उरण परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खारफुटींचीदेखील कत्तल करण्यात येत आहे. ही खारफुटी जळण म्हणून येथील नागरिक वापरत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कोणी बेकायदेशीर वृक्षतोड करत असेल, तर वनविभागाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. आत्ताच 30 डिसेंबरला आम्ही बेकायदेशीर खैराची झाडे तोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे व त्यांना त्या संदर्भात कोठडीदेखील झाली आहे.
एन. जी. कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी






