। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाचे नाके, चौक गॅसवर असून, त्या ठिकाणी आगीचा धोका सतावत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. त्यात शहराबाहेरून येणार्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासून आठवडे बाजारही भरवले जात आहेत. तर अनेक नोडमधील रस्ते, पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत, त्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ शिजविणार्या विक्रेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रहदारीच्या ठिकाणीच गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवले जात आहेत. याकरिता घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जात आहेत. अशा वेळी एखाद्या चुकीमुळे आग लागल्यास सिलिंडरचा स्फोटही होऊ शकतो, असे बहुतांश खाद्यपदार्थविक्रेते महत्त्वाचे चौक व रदहारीच्या रस्त्यांलगतच बसलेले असतात. यामुळे त्यांच्याकडील सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. अथवा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेलही पादचारी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.
नवीन पनवेल शहरात रेल्वे स्थानक परिसरात वर्दळीच्या ठिकाणी बेकायदेशीर टपरीधारकांनी महानगरपालिका कुठलाही व्यवसाय परवाना न घेता टपरीमध्ये हाँटेल सुरू केले असून सायंकाळी फूटपाथवर उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जाते. फूटपाथवर रात्री भांडी धुऊन सर्व घाण, सांडपाणी रस्त्यावर व आजूबाजूच्या गटारात टाकले जाते. येथील फेरीवाल्यांचे नातेवाईक पालिकेत कामाला आहेत, असे येथील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे.