साळाव पुलावर उघडे खड्डे

रस्ते दुरुस्तीच्या कामात सुरक्षेचा बोजवारा; बॅरिकेड्स, इशारा फलकाविना काम सुरू

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा-मुरुड मार्गावरील कुंडलिका खाडीवरील साळाव पुलाच्या सुरुवातीलाच सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामात गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी खोदण्यात आलेले खोल खड्डे कोणतीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था, मजबूत बॅरिकेड्स किंवा स्पष्ट इशारा फलक न लावता उघडे ठेवण्यात आल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यातच सध्या पावसाळी वातावरण, रात्रीची कमी दृश्यमानता आणि वाहनांचा वेग लक्षात घेता या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षेची प्राथमिक व्यवस्था न करता रस्त्याचे काम सुरू ठेवणे म्हणजे अपघाताला थेट निमंत्रणच, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा प्रकार मुरुड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजेश तरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ साळाव तपासणी नाक्यावरील वाहतूक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर धोकादायक ठिकाणी तात्पुरते बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे तरे यांनी सांगितले.

रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच धोकादायक खड्ड्यांभोवती मजबूत बॅरिकेड्स, परावर्तित इशारा फलक आणि रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, तसेच रस्ते कामाच्या दर्जाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?
महत्त्वाच्या मार्गावर अशा प्रकारे सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असताना संबंधित ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही? कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ठेकेदाराच्या मनमानीवर नागरिकांचा संताप
रस्ते कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना पुरेसा इशारा मिळावा, यासाठी बॅरिकेड्स, परावर्तित फलक, रात्रीची प्रकाशव्यवस्था यांसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. कामाचा दर्जा, गती आणि सुरक्षितता या तिन्ही बाबींवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Exit mobile version