शासकीय यंत्रणेची मुक संमती
। उरण । वर्ताहर ।
तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात. यामुळे वेळप्रसंगी कर्करोग होऊन जिवाला देखील मुकावे लागते. हा धोका ओळखून महाराष्ट्र शासनाने 2012 मध्ये गुटखा विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, परराज्यातून दाखल होणार गुटखा किराणा दुकाने, पानटपर्यावर सर्रासपणे विकला जात आहे. गुटखा बरोबर काही ठिकाणी चरस, गांजाची विक्री देखील केली जात आहे. यामुळे कारवाईची जबाबदारी असणार्या शासकीय यंत्रणेकडून याला मूक समंती असल्याचे चित्र आहे.
शाळा, पोलीस ठाणे, हॉस्पिटल जवळील टपरीवर गुटखा व इतर नशिली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. यामुळे उरण शहरातील व तालुक्यातील तरुण पिढी याच्या आहारी गेली आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. इतर तालुक्यात लाखों रुपयांचा गुटखा विकला जात असताना पकडला जातो. मात्र, उरणमध्ये आजतागायत गुटखा किंवा इतर नशिली पदार्थांचा साठा कधी पकडला जाईल, अशी चर्चा जनतेत सुरू आहे.
उरणमधील टपरी धारक व गुटखा होलसेल हे मध्यरात्री पर्यंत दुकान उघडे ठेऊन गुटख्याची विक्री करत असतात. तर, दुचाकीच्या डिकीत ठेऊन गुटख्याची विक्ती करत असतात. दरम्यान, एका गुटखा विक्रत्याने भाड्याची टपरी चालवून द्रोणागिरी नोडमध्ये मोठा गाला व सदनिका खरेदी केली आहे. यापूर्वी त्याच्यावर कारवाई होऊन काही दिवसांनी सुटका झाल्यानंतर पुन्हा जोमाने गुटखा विक्री सुरू केली आहे. तसेच, आम्ही अन्न व औषध प्रशासन विभाग आणि इतर अधिकार्यांना नियमित पाकीट देत असल्याने ते कारवाई करू शकत नाहीत, अशी दरपोक्ती उरणमधील गुटखा माफिया व विक्रेते करीत आहेत.
पान टपर्यांसमोर पुड्यांचा खच
पान टपर्यामध्ये गुटखा पुडीची माळ लटकावून ठेवण्याचा प्रकार बंद झाला आहे. मात्र, कुठेही गुटखा पुडी मागितल्यास ती एमआरपीपेक्षा अधिक दर घेऊन तात्काळ कागदामध्ये गुंडाळून ग्राहकांच्या हाती दिली जाते. तसेच, पान टपर्यांसमोर रिकाम्या गुटख्याच्या पुड्यांचा खच पडलेला दिसतो. मात्र, यावर कोणतीच कारवाई होत नाही.
कारवाईची मागणी
पान टपर्यापर्यंत व छोट्या-मोठ्या ठेल्यापर्यंतच्या वितरणाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात गुटख्याच्या व्यवहारातून लाखों रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, हा व्यवहार चालतो कसा हे जाणून संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.







