ओपन टेनिस स्पर्धा

भारताची सहजा यमलापल्ली उपांत्य फेरीत

| मुंबई | प्रतिनिधी |

सोलापूर येथे सुरू असलेल्या महिला आयटीएफ प्रिसिजन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताची सहजा यमलापल्ली, रशियाची एकतेरिना मकारोवा, जपानची साकी ईमामुरा, डायना मर्सिचेविका यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुहेरी गटात जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा ही जोडी जपानच्या फुना कोनाकी व मिसाका मासूदा यांच्यात अंतिम सामना होणार आहे. एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहज यमलापल्ली हिने जपानच्या हिरोमी आबेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

लात्वियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सिचेविकाने ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीचा 6-4, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. जपानच्या साकी इमामुराने रशियाच्या डारिया कुडाशोवाचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाने भारताच्या आठव्या मानांकित वैदेही चौधरीचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुहेरीत उपांत्य फेरीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने रशियाच्या तिसऱ्या मानांकित एकतेरिना काझिओनोवा व एकतेरिना याशिना यांचा 7-6, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांचा 6-4, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

Exit mobile version