खासगी वाहनातून खुलेआम दारूची वाहतूक

आरटीओकडून परवाना? जनतेचा आरोप
। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातून वाईनशॉपमधून गावोगावी खासगी वाहनातून दारूचा पुरवठा होत असतानाही त्यांच्यावर आरटीओकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांना दारूचा पुरवठा करण्याचा परवाना तर दिला नाही ना, अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
उरणमधील वाईनशॉप हे तालुक्यातील द्रोणागिरी नोड, पागोटे, भेंडखळ, फुंडे, चिरनेर, विंधणे, आवरे, गोवठणे आदींसह अनेक ठिकाणी पुरवठा केला जात असल्याने दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. त्यातील काही हिस्सा अधिकारी वर्गाना वाटप केला जात असल्याचे वाईन शॉपवाले सांगतात. वाईनशॉप उघडण्याच्या वेळेचे उल्लंघन करून सह्याद्रीराजवरून उरण शहरातून संजय, रुपेश व मनोहर हे आपल्या मालकीच्या रिक्षातून प्रवासी वाहतूक करण्याऐवजी सकाळी 7 वाजताच दारू भरून गावोगावी पोहचविण्याचे काम करीत असतात. याबाबत आरटीओ विभागाकडे लेखी तक्रार करूनही ते कोणतीच कारवाई न करता त्यांना आर्थिक हितसबंधातून पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सदर रिक्षा चालकांना गावोगावी दारूचा पुरवठा करण्याचा परवाना आरटीओनी दिला असल्यानेच ते खुलेआम दारूची वाहतूक रिक्षातून करीत असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
याबाबत दारूबंदी अधिकारी वर्गाकडे वारंवार तक्रार करुनही ते कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. यावरून त्यांचे आर्थिक सबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी दारूबंदीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांनी याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version