पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

भारताच्या 84 खेळाडूंकडून अपेक्षा

| पॅरिस | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयफेल टॉवर आणि ट्रोकाडेरो पॅलेससह तरंगत्या ‌‘परेड ऑफ नेशन्स’चे यजमानपद भूषवणाऱ्या सीन नदीच्या काठी पार पडला होता. त्याचप्रमाणे गुरूवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ‌‘सिटी ऑफ लाईट’ मधील प्लेस डेला कॉन्कॉर्ड आणि चॅम्प्स-एलिसीज येथे पार पडला. तसेच, परंपरेला फाटा देत ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेचा हा सोहळा प्रथमच स्टेडियमच्या बाहेर रंगवण्यात आला.

पॅरिस पॅरालिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताकडून सुमीत अंतिल व भाग्यश्री जाधव यांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या 84 खेळाडूंनी सहभाग घेतला असून ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी आहे. यामध्ये 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी 12 खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार असून सर्वाधिक 38 खेळाडू ऍथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत.

भारताने एकूण 12 पॅरालिम्पिक स्पर्धेत 9 सुवर्ण, 12 रौप्य आणि 10 कांस्यपदकांसह 31 पदके जिंकली आहेत. मुरलीकांत पेटकर हे पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी हेडलबर्ग 1972 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच, देवेंद्र झाझरिया हा पॅरालिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकणारा एकमेव भारतीय ठरला आहे.

पॅरिसमध्ये जगभरातील 4 हजार 400 खेळाडू पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत. 11 दिवस रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 22 खेळांमध्ये एकूण 549 पदकांसाठी झुंज लागणार आहे. या पॅरालिम्पिक स्पर्धेत शीतल देवी (तिरंदाज), हरविंदर सिंग (तिरंदाज), होकातो सेमा (गोळाफेकपटू), नारायणा कोंगनापाल्ले (रोवर), मनीष नरवाल (नेमबाज), कृष्णा नागर (बॅडमिंटनपटू), सुहास यथिराज (बॅडमिंटनपटू), भाविना पटेल (टेबलटेनिस) यांच्याकडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत.

Exit mobile version