समारोप कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन
| टोकियो | वृत्तसंस्था |
कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलून मागील 17 दिवस जगभरातील क्रीडारसिकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर रविवारी टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा धडाक्यात संपन्न झाला. जपानमधील संस्कृतीचे दर्शन घडवणार्या या सोहळ्यात 2024मध्ये पॅरिसला पुन्हा भेटू, असा संदेश देत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी चाहत्यांचे आभार मानले.
उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच नॅशनल स्टेडियमवर झालेल्या समारोप सोहळ्यातही फटाक्यांची आतषबाजी आणि भव्यदिव्य रोषणाईने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कोरोनामुळे वर्षभराने लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेच्या आयोजनावर यंदाही असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सोहळ्याच्या सुरुवातीला गेल्या वर्षभरातील घडामोडींचा आणि स्पर्धेच्या तयारीचा धावता आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर गेल्या 17 दिवसांत क्रीडापटूंच्या यशापयशाच्या प्रसंगातील विविध भावनांचीही एक झलक दाखवण्यात आली. जपानच्या राष्ट्रगीताद्वारे अन्य कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मग सर्व देशांच्या क्रीडापटूंनी संचलन केले. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया समारोप सोहळ्यासाठी ध्वजवाहकाच्या भूमिकेत होता.
शेवटी बाख यांनी सर्वाचे आभार मानतानाच ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले. मग ऑलिम्पिक ज्योत विझवून 24 ऑगस्टपासून रंगणार्या टोकियो पॅरालिम्पिकलाही सर्वांनी तितकाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बाख यांनी केले. त्यानंतर ‘आरिगातो’ (धन्यवाद) असा शब्द लिहिलेले फुगे हवेत सोडून सोहळा संपवण्यात आला.