बांधकाम करणार्यांना आशीर्वाद कोणाचा?
दुरुस्तीच्या नावाखाली नवीन बांधकामांना ऊत
पेण | वार्ताहर |
गेले वर्षभरात पेण नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बांधकाम सुरु आहे. यामध्ये बांधकाम करणारे मालक आयडियाची कल्पना लढवून नवीन बांधकाम करण्यासाठी दुरुस्तीची परवानगी मागतात आणि नव्याने बांधकाम सुरु करतात, हे नियमानुसार चुकीचे आहे. अशा अनधिकृतरित्या बांधकाम करणार्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, याची सध्या जोरात सुरु आहे.
गेल्या आठवडाभरापासून तर पेण शहरातील लालबहादूर शास्त्री मार्गावर, म्हणजेच भरमार्केटमध्ये दोन ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकाम तोडणे व बांधकाम करणे सुरु आहे, तर एका ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा उपयोग करुन बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सुरु असताना नगरपालिकेकडे कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. तसेच नियमानुसार बांधकाम करताना रस्त्यापासून काही अंतर सोडणे गरजेचे असते; परंतु तशा प्रकारे कोणतेही अंतर सोडलेले नाही. बांधकाम करणारा जगदीश नामक ठेकेदार हा एका लोकप्रतिनिधीच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या महाशयाने भरबाजारातील इमारत तोडली आहे. मात्र, याबाबत नगरपालिकेतील अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत, ही मोठी आश्चर्याची बाब आहे. तर, सदरचे मालक नरेश म्हात्रे व जगदीश म्हात्रे यांना नगरपालिकेकडून बांधकाम करण्याची परवानगी घेण्याची गरज भासली नाही. यामागील नक्की गौडबंगाल काय आहे, हे पेणकरांना समजत नाही. सर्वसामान्यांना कायदा शिकवणारे अधिकारी आज इमारतीच्या बांधकामाविषयी मूग गिळून गप्प का, असा सवाल पेणकर करत आहेत. या सर्व बाबींमुळे अधिकारी वर्गाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर, याच रस्त्यावर पुढे महावीर ज्वेलर्ससमोर एक तीन मजली इमारत तोडायला सुरुवात केलेली आहे. मात्र, हा तोडण्याचा काम सुरु असताना या रस्त्यावरुन चालणार्या सर्वसामान्य पेणकरांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात नाही. पूर्ण इमारतीला पत्र्यांनी झाकून घेतले आहे. मात्र, पत्रे जे बांधले आहेत, ते कधीही रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतो. हा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? नगरपालिकेचे अधिकारी की इमारत तोडणारे इमारतीचे मालक.
या प्रकाराबाबत नगरपालिकेच्या अधिकार्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु याबाबत माहिती देण्यासाठी अधिकारी उपलब्ध झाले नाहीत.