माजी आ.पंडित पाटील आक्रमक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर असुविधा निर्माण झाली आहे. स्वच्छतेचे प्रश्न आहेत. अनेक पदे रिक्त आहेत. याठिकाणी जिल्हा रुग्णालय असताना रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळत नसेल तर त्याचे नामकरण सार्वजनिक पोस्ट ऑफिस करावे, अशी उपहासात्मक टीका माजी आ. पंडीत पाटील यांनी केली. जिल्हा रुग्णालयात गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करु नका. असे बजावतानाच गरीब रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा द्या. त्यांना इतरत्र हलविण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी सुचना शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली. जिल्हा रुग्णालयातील अपुर्या आरोग्य व्यवस्थेविरोधात गुरुवारी (दि.8) पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक भेट दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर,, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, माजी नगरसेवक अजय झुंजारराव, अनिल चोपडा, शहर चिटणीस अशोक प्रधान, वृषाली ठोसर, संजना किर, शहर महिला आघाडी प्रमुख पल्लवी आठवले, माजी सरपंच सत्यविजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे व उपअभियंता राजेंद्र डोंगरे, कृतिका रानवडे, नरेश गोंधळी, प्रशासन अधिकारी परशराम धामोडा, शेकाप आरोग्य सेलचे रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथील कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचार्यांना गेली दोन महिने वेतन मिळत नाही. जिल्हा रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामांतील निष्काळजीपणा अशा अनेक विषयांवर पंडित पाटील आक्रमक झाले. गुरुवारी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्या तातडीने सोडवा. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा दिला.
यापूर्वी जीएसटी नसताना राज्य शासनाने मोठया प्रमाणावर विकासकामे केली. आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे पुरविली जात होती. मोठमोठी लोकं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होते. मात्र आता जीएसटीच्या रुपाने हजारो कोटी शासनाला मिळत असतानाही त्याचा वापर जर जनतेच्या कामासाठी होत नसेल तर काय उपयोग असा प्रश्न पंडित पाटील यांनी केला.
आ. जयंत पाटील यांनी आरोग्याचे प्रश्न मांडले
जिल्ह्यात मोठया प्रमाणावर आरोग्याचे प्रश्न असताना त्याकडे कुठल्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष असू नये, यासारखे दुर्दैव नाही. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य व्यवस्थेतील समस्यांकडे फक्त शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीच विधानपरिषदेेत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले असल्याचे पंडित पाटील यांनी निदर्शनास आणले. तसेच जिल्हा रुग्णालयात नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व इतर कार्यकर्त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. चित्रलेखा पाटील यांनी कोरोना काळात संपूर्ण कक्ष सुरु करुन दिले असल्याची आठवण देखील यावेळी पंडित पाटील यांनी करुन दिली.
रुग्णांना अयोग्य वागणूक
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेसाठी एजन्सी ठेका देऊनही एजन्सी योग्य ती स्वच्छता राखण्यास उदासीन ठरत आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना मुंबई व अन्य दवाखान्यात हालविले जात आहे. त्यात रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांकडून रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदींना योग्य वागणुक दिली जात नाही. इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध होऊनही त्याचे काम संथगतीने होत आहे. अशा अनेक प्रश्नांबाबत पंडित पाटील आक्रमक झाले.
जिल्हा रुग्णालयात येणार्या रुग्णांना रुग्णालयाबाबत विश्वास संपादन करण्यास यंत्रणा कमी पडत आहे. कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व अऩ्य कर्मचार्यांचे मानधन गेल्या दोन महिन्यांपासून देण्यात आले नाही. तरीदेखील ही मंडळी काम करीत आहेत. त्यांना मानधन वेळेवर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजनासह सीएसआर फंडातून जिल्हा रुग्णालयाला अद्ययावत मशीन देण्यात आल्या आहेत. परंतू त्यांचाही वापर स्थानिकांसाठी होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना चांगली सेवा कशी मिळेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शंभर कोटीपेक्षा अधिक निधी रुग्णालयासाठी जिल्हा नियोजनाकडून देण्यात आला आहे. मात्र त्याचा वापर योग्य पध्दतीने करावा.
माजी आमदार पंडित पाटील