वडाळे सरोवरावर खगोलप्रेमींची गर्दी
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
दीपावलीच्या उत्सवी वातावरणात फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई आणि फराळाची मेजवानी यांसोबतच यंदा पनवेलकरांना आकाशातील चंद्राची कोर जवळून पाहण्याची अनोखी संधी मिळाली. पनवेल येथील वडाळे सरोवर परिसरात दुर्बिणीच्या माध्यमातून चंद्राचे दर्शन घडविण्यात आले.
विचुंबे येथे राहणारे अद्वैत पाटील यांनी आणलेल्या विशेष टेलिस्कोपच्या माध्यमातून नागरिकांना चंद्राचे जवळून निरीक्षण करता आले. आकाशात दिसणारी चंद्राची नाजूक कोर दुर्बिणीतून अधिक स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विशेषतः लहान मुलांमध्ये या उपक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून आली. दुर्बिणीतून चंद्राचे दर्शन घेताना मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद ओसंडून वाहत होता. अनेक पालकांनीही मुलांसोबत या अविस्मरणीय क्षणाचा आनंद घेतला. आकाशात रोज दिसणारा चंद्र दुर्बिणीतून इतक्या जवळून पाहता येतो, याचा अनुभव अनेकांसाठी नवीन होता. चंद्रावरील खड्डे आणि पृष्ठभागावरील रचना पाहताना नागरिकांनी कुतूहल व्यक्त केले. दिवाळीच्या सुट्टीत मनोरंजनासोबतच विज्ञान आणि खगोलशास्त्राची आवड निर्माण करणारा हा उपक्रम विशेष ठरला. अद्वैत पाटील यांच्या पुढाकारामुळे वडाळे सरोवर परिसरात दिवाळीच्या आनंदाला वैज्ञानिक कुतूहलाची अनोखी जोड मिळाली.






