विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बनियन-टॉवेल लावून घोषणाबाजी
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियन घातले आणि कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कँटिनमध्ये बनियन आणि टॉवेलवरच एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते आपल्या बेडरुममध्ये बनियनवर बसलेले दिसत होते. तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याही घरातील टॉवेलवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तीनही घटनांचा संदर्भ घेत विरोधकांनी शिवसेना (शिंदे) गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, महेश सावंत यांनी या आंदोलनात सहभाग घेत जोरदार नाजेबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात चड्डी बनियन गँगने हैदोस घातला आहे. कँटिनमध्ये जाऊन आमदार साध्या कर्मचाऱ्याला मारहाण करतात. कुणी सिगारेट पिताना सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात. कुणी चड्डी-बनियनवर घरात बसून ओम फट म्हणतात. चड्डी बनियन गँगची दहशत पूर्वी महाराष्ट्रात होती. ही गँग शेतात, वस्त्यांवर दरोडे टाकायची. आताची चड्डी बनियन गँग महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचे काम करत आहे.






